गाणं कशात असतं ? बाबा मला सांगा ना गाणं कशात असतं ? बाबा सांगे लेकीला ..अगं ते कशात नसतं ? एकसाथ नमस्तेला, गाणं तुमच्या शाळेत असतं निखळून खाली पडताना ते, गोल मण्यांच्या माळेत असतं.... गाणं आगगाडीच्या, लांबलचक शिटीत असतं... विटीदांडू खेळताना ते, उंच मारल्या विटीत असतं... गाणं घुंघुर लावल्या बैलगाडीच्या, धावणाऱ्या चाकात असतं... रवीे फिरवून घुसळताना ते, फेसाळलेल्या ताकात असतं... गाणं टप टप पडणाऱ्या बर्फाच्या, गार गार गारेत असतं... कोसळणाऱ्या पावसाच्या, मुसळधार धारेत असतं... गाणं घोंघावणाऱ्या सोसाट्याच्या, थंड गार वाऱ्यात असतं... खडकावर आदळणाऱ्या, लाटांच्या माऱ्यात असतं... गाणं फुलं आणि फुलपाखरांच्या रंगीत रंगीत बागेत असतं... समेवर सुंदर घेतलेल्या, त्या नेमक्या जागेत असतं... ...