एखादा सूर असा यावा
एखादा सूर असा यावा
क्षितिजाचा पार दिसावा।।
सारा आसमंत उजळून जावा।।
एखादी तान अशी बरसावी
सारी तृष्णा मिटून जावी।।
एखादी सरगम अशी लहरावी
वार्यालाही भूल पडावी।।
एखादी लय अशी जुळावी
सारी जाणीव विरुन जावी।।
एखादा ताल असा भरावा
अंतापर्यंत तोल रहावा।।
एखादी सम अशी पडावी
जिवाशिवाची गाठ व्हावी।।
एखादा राग असा फुलावा
अनंताला जाऊन भिडावा।।
एखादा ख्याल असा मांडावा
यमुनातीरी ताज बनावा।।
एखादी ठुमरी अशी रंगावी
इंद्रधनूची कमान व्हावी।।
एखादं गीत असं छेडावं
शब्दांपलिकडे बोलकं व्हावं।।
एखादं भजन असं गावं
निर्गुणाचं कोडं सुटावं।।
एखादा श्रोता असा मिळावा
अद्वैताचा स्पर्श घडावा।।
एखादा संवाद असा जुळावा
गगेवरती चंद्र झुलावा।।
एखादी मैफिल अशी जमावी
गाभा-यागत पुनीत व्हावी।।